Thursday, May 11, 2023

इट्टी-दांडू

इट्टी-दांडू
सुट्ट्यामध्ये खेळण्याच्या काही
खेळामध्ये विटी-दांडू हा पण एक खेळ. हा निसर्गाच्या जवळ जाणारा खेळ.विटी एखादया फांदीपासूनच बनवायचे. दांडू म्हणजे लाकडी दांडा हातात धरता येईल असा शक्यतो पुढचा भाग निमुळता केलेला तासून गुळगुळीत केलेला दांडू आणि विटी ही पण दांडूचाच भाग पण तळहातात सहज बसेल अशी एवढीच मोठी. विटीचा मात्र दोन्ही भाग तासलेले. दोन्हीकडून टोकदार होत गेलेली पण टोकाला गुळगुळीत केलेली. खरंतर हा खेळ खूप जुना असावा.प्राचीन काळापासून हा खेळ खेळला जात असल्याचा उल्लेख आहेत. आजूबाजूच्या परिसरातून उपलब्ध होणारे खेळाचे साहित्य. मोकळ्या जागेत खेळला जाणारा खेळ.

एक एकावर राज्य यायचं. विटीला बोली भाषेत इट्टी म्हणायचो. ती जमीनीवर बोटाइतक्या जागेवर थोडी गल करून आडवी ठेवायची. खेळणारा विटीच्या खाली दांडू ठेवून जेवढ्या लांब जाईल तेवढ जमिनीला जोर देऊन मारायचा म्हणजे कोलायचा. खेळणारी सगळी मुलं क्रिकेटला उभारतात तशी उभी राहून इट्टी पकडायचा प्रयत्न करायचे.पकडली तर आउट मग दुसरा गडी खेेेळा यचा.नाहीच पकडता आली तर जिथं ती पडलेली असायची तिथ जाऊन दांडूने इट्टीच्या कडेवर जोरात मारून ती जेवढ्या लांब जाईल तेवढी उडवायची आणि अजून दूरवर मारायची. असे तीन वेळा करायचं. त्यानंतर तिथून गलीपर्यंतचं अंतर दांडूने मोजायचं. आउट होईपर्यंत एखादा खेळत रहायचा आणि जो पण आकडा यायचा. त्याला तुझे एवढे झाले रे असे म्हणायचं. त्याला गुण,स्कोर असं काही म्हणत नसायचे. आणि कुठे लिहित पण नव्हते.सगळी मुलं डोक्यातच त्याची नोंद ठेवायचे.ज्याचा स्कोर सर्वात जास्त व्हायचा तो जिंकला.हं पण खेळतांना कुणाला इट्टी तीन वेळाही मारता नाही आली तर कानाला हात लावून कोपऱ्याने गलीपर्यंत इट्टी आणायला लावायची. खेळात खेळण्याचा पहिला नंबर त्याचाच होता ज्याच्याकडे स्वतःचं इटटी-दांडू असायचं. जी मुलं मामाच्या गावाला जाऊन येतांना इटी-दांडू घेऊन यायचे.ते लई शान मारायचे. त्यांचा खूप हेवा वाटायचा. आपल्याला एखादा मामा का नाही असं खूप वाईट वाटायचं.मग गावखेड्याकडे राहणाऱ्या एखाद्या पाहुण्यांना विनवणी करायचो.वाट बघून बघून मित्रांकडे असणाऱ्या या विटी दांडूसारख्या लाखमोलाच्या दस्ताऐवजाला खेळूनच समाधान मानायचो.

    बऱ्याचदा ही इट्टी हरवायची.खूप शोधायचो. झाडा-झुडपांत,अडचणीत शोधतांना जिवाची पर्वा नव्हती. काही काही वेळेस इट्टी सापडलीच नाही. सगळ्यांचा हिरमूस व्हायचा. पण त्यावेळी मुलं बोर किंवा निराश होत नव्हती. लगेच चला दुसरं काहीतरी खेळू म्हणायचे. आनंदाचं आणि समृद्धीचं ते बालपणीचं दुसरं दार आम्ही लगेच उघडायचो..

मैदानावर खेळायला खूपदा जाणं व्हायचंच नाही. तेव्हा गल्लीतच खेळायचो इटी दांडूच्या खेळात मग इट्टी कुणाला लागायची, कुणाच्या स्लॅबवर गच्चीवर, पत्र्यावर, एखादयाच्या घरात पण जायची. खूप बोलणं खावं लागायचं,  तरीही ते कधी कधी इट्टी देत नव्हते.इट्टी दांडू खेेेेेळताना थोडं जपूनच खेळावं लागतं कारण इट्टी लागण्यााची जोखिम असायची.इजा होण्याची भीती तर प्रत्येक खेळात असतेच.

असा खेळ आजच्या पिढीतल्या बालगोपाळांना माहितही नसावा.मोबाईल पासून सुुुटका मिळवून देणारा आणखी एक खेळ आणि अनुभव.

ज्यांनी ज्यांनी हा खेळ खेळला त्यांचे अनुभव आणखी सुंदर आणि वेगवेगळे असू शकतात.© श्री.प्रदिप सुरवसे


No comments:

Post a Comment