Saturday, December 30, 2023

न मंतरलेल्या वेळा

न मंतरलेल्या वेळा..
न मंतरलेल्या ही असतात वेळा
न मंतरलेले शब्द उशाशी 
न मंतरलेली स्वप्न घेऊन स्वागता 
निशेच्या नयनी डोळा

न मंतरलेल्या दिवसांच्या पुन्हा वेळा 
ही नवी स्वप्ने नवी दिशा नव्या आशा 
पहाटे साठी निजतो आसमंत निळा

न मंतरलेल्या पहाटवेळी 
मी वाट नव्याने बघतो 
तो येईल भास्कर पूर्वेला
घेऊन तेजांच्या कोटीमाळा

दि.३०.१२.२०२३ 

Saturday, May 27, 2023

निरर्थक शब्द

संवाद-बोलणं या सर्वांमध्ये शब्दांना खूप महत्त्व आहे चारचौघात गप्पा मारताना लोक खूप मोठ्या मोठ्या गोष्टी बोलतात  उच्च विचारांच्या गोष्टी बोलतात लोकं सोशल मीडियावर लिहितात वृत्तपत्रातील लिहितात व्याख्यान पण देतात आजकाल तर फेसबुक व्हाट्सअप सारख्या आभासी जगामध्ये चांगले सुविचार संतांचे विचार फॉरवर्ड करण्याचा किंवा स्टेटस ठेवण्याचा एक प्रकार चालू आहे लोक समुदायासमोर काहीतरी वेगळच बोलत असतात आणि प्रत्यक्ष आयुष्यात त्याच्याविरुद्ध जगणं जगत असतात अशा लोकांची कीव येते प्रतिष्ठा पैसा आणि प्रसिद्धीसाठी लोक काहीही करू शकतात याची प्रचिती जवळून आली आहे आणि आपल्यापैकी बऱ्याच जणांना याचा अनुभव देखील आला आहे 
        जी लोक स्त्रीचा सन्मान करण्याच्या गप्पा मारतात तीच माणसं वंशाला दिवा पाहिजे म्हणून गपचूप लिंग तपासणी करतात लग्न झाल्यानंतर नवदांपत्यांना वर्ष दोन वर्ष उलटून गेले आणि नवीन बाळाची काही चाहूल लागेना अशा वेळेस सर्व कुटुंबीय नवस करायला तयार होतात की 
 

Thursday, May 11, 2023

इट्टी-दांडू

इट्टी-दांडू
सुट्ट्यामध्ये खेळण्याच्या काही
खेळामध्ये विटी-दांडू हा पण एक खेळ. हा निसर्गाच्या जवळ जाणारा खेळ.विटी एखादया फांदीपासूनच बनवायचे. दांडू म्हणजे लाकडी दांडा हातात धरता येईल असा शक्यतो पुढचा भाग निमुळता केलेला तासून गुळगुळीत केलेला दांडू आणि विटी ही पण दांडूचाच भाग पण तळहातात सहज बसेल अशी एवढीच मोठी. विटीचा मात्र दोन्ही भाग तासलेले. दोन्हीकडून टोकदार होत गेलेली पण टोकाला गुळगुळीत केलेली. खरंतर हा खेळ खूप जुना असावा.प्राचीन काळापासून हा खेळ खेळला जात असल्याचा उल्लेख आहेत. आजूबाजूच्या परिसरातून उपलब्ध होणारे खेळाचे साहित्य. मोकळ्या जागेत खेळला जाणारा खेळ.

एक एकावर राज्य यायचं. विटीला बोली भाषेत इट्टी म्हणायचो. ती जमीनीवर बोटाइतक्या जागेवर थोडी गल करून आडवी ठेवायची. खेळणारा विटीच्या खाली दांडू ठेवून जेवढ्या लांब जाईल तेवढ जमिनीला जोर देऊन मारायचा म्हणजे कोलायचा. खेळणारी सगळी मुलं क्रिकेटला उभारतात तशी उभी राहून इट्टी पकडायचा प्रयत्न करायचे.पकडली तर आउट मग दुसरा गडी खेेेळा यचा.नाहीच पकडता आली तर जिथं ती पडलेली असायची तिथ जाऊन दांडूने इट्टीच्या कडेवर जोरात मारून ती जेवढ्या लांब जाईल तेवढी उडवायची आणि अजून दूरवर मारायची. असे तीन वेळा करायचं. त्यानंतर तिथून गलीपर्यंतचं अंतर दांडूने मोजायचं. आउट होईपर्यंत एखादा खेळत रहायचा आणि जो पण आकडा यायचा. त्याला तुझे एवढे झाले रे असे म्हणायचं. त्याला गुण,स्कोर असं काही म्हणत नसायचे. आणि कुठे लिहित पण नव्हते.सगळी मुलं डोक्यातच त्याची नोंद ठेवायचे.ज्याचा स्कोर सर्वात जास्त व्हायचा तो जिंकला.हं पण खेळतांना कुणाला इट्टी तीन वेळाही मारता नाही आली तर कानाला हात लावून कोपऱ्याने गलीपर्यंत इट्टी आणायला लावायची. खेळात खेळण्याचा पहिला नंबर त्याचाच होता ज्याच्याकडे स्वतःचं इटटी-दांडू असायचं. जी मुलं मामाच्या गावाला जाऊन येतांना इटी-दांडू घेऊन यायचे.ते लई शान मारायचे. त्यांचा खूप हेवा वाटायचा. आपल्याला एखादा मामा का नाही असं खूप वाईट वाटायचं.मग गावखेड्याकडे राहणाऱ्या एखाद्या पाहुण्यांना विनवणी करायचो.वाट बघून बघून मित्रांकडे असणाऱ्या या विटी दांडूसारख्या लाखमोलाच्या दस्ताऐवजाला खेळूनच समाधान मानायचो.

    बऱ्याचदा ही इट्टी हरवायची.खूप शोधायचो. झाडा-झुडपांत,अडचणीत शोधतांना जिवाची पर्वा नव्हती. काही काही वेळेस इट्टी सापडलीच नाही. सगळ्यांचा हिरमूस व्हायचा. पण त्यावेळी मुलं बोर किंवा निराश होत नव्हती. लगेच चला दुसरं काहीतरी खेळू म्हणायचे. आनंदाचं आणि समृद्धीचं ते बालपणीचं दुसरं दार आम्ही लगेच उघडायचो..

मैदानावर खेळायला खूपदा जाणं व्हायचंच नाही. तेव्हा गल्लीतच खेळायचो इटी दांडूच्या खेळात मग इट्टी कुणाला लागायची, कुणाच्या स्लॅबवर गच्चीवर, पत्र्यावर, एखादयाच्या घरात पण जायची. खूप बोलणं खावं लागायचं,  तरीही ते कधी कधी इट्टी देत नव्हते.इट्टी दांडू खेेेेेळताना थोडं जपूनच खेळावं लागतं कारण इट्टी लागण्यााची जोखिम असायची.इजा होण्याची भीती तर प्रत्येक खेळात असतेच.

असा खेळ आजच्या पिढीतल्या बालगोपाळांना माहितही नसावा.मोबाईल पासून सुुुटका मिळवून देणारा आणखी एक खेळ आणि अनुभव.

ज्यांनी ज्यांनी हा खेळ खेळला त्यांचे अनुभव आणखी सुंदर आणि वेगवेगळे असू शकतात.© श्री.प्रदिप सुरवसे


Tuesday, May 9, 2023

आंब्याची कोय

आंब्याच्या कोया

ऊन खूप तापलेले असायचे.आम्ही गल्लीतले सर्व मित्र कुठल्यातरी झाडाखाली किंवा सावलीला तासनतास खेळत बसायचो.घरच्या लोकांची फक्त एकच ताकीद असायची अरे उन्हात जाऊ नका.बरोबर नेम धरून कोय उडवायची जिंकलेल्या सर्व कोया जमा करायच्या. डाव झाल्यावर प्रत्येकाने आप्पापल्या कोया प्लास्टिकच्या पिशवीत भरायच्या आणि घरी आणायच्या.त्यावेळी जग जिंकल्याचा आनंद व्हायचा.घरी आंबे आणल्यावर एकही कोय बाहेर फेकून दिली जाणार नाही याची काळजी घेतली जायची.घरच्या कोयांपेक्षा थोड्या जरी जास्त जिंकल्या तरी खूप आनंद वाटायचा.आम्ही लहानपणी आंब्याच्या या कोया एकमेकांना उसन्या पण द्यायचो.काही गरीब मुलं कचऱ्यातील कोया आणायचे आम्हाला त्या जिंकल्या तरी नको वाटायच्या.पण काही चांगल्या घरची मुलं केशरी रंगाचा स्वच्छ धुतलेल्या कोया आणत असंत. त्या मात्र आपणच जिंकाव्या असं प्रत्येकाला वाटायचं. कोयांपासून साबण बनवतात अशी पण एक अफवा त्या वेळी पसरली होती.बरं मग विकायच्या कुठं तर भंगारवाला किंवा रद्दीवल्याकडे.मुळात हा जावईशोध कुणी लावला होता तो पटठ्या काही सापडला नाही.उन्हाळायात जमवलेल्या कोया काहीजण मामाच्या गावाला घेऊन जायचे.शेतात आंब्याची झाडं लावायला.त्यातली किती झाडं यायची हे मामालाच माहीत.

उन्हाळा संपत आला की पावसाळ्याच्या तोंडावर बऱ्याच ठिकाणी या कोया उगवून यायच्या.मग आम्ही त्याची मस्त पिपाणी बनवायचो.आणि ती वाजवत फिरणे हा पण एक उद्योग्य होता.

पुढे पावसाळा सुरू झाला की त्या कोयांचं काय व्हायचं काळाच्या ओघात त्या कुठे जायच्या हे पुढचा उन्हाळा सुरू होईपर्यंत कुणाच्या ध्यानी पण येत नव्हते.आंब्याचा रस खाऊन उरलेला भाग म्हणजे टाकाऊ कोयंपासून आम्ही आमचं बालपण टिकाऊ करत होतो.

आंब्याच्या कोया खेळणे हा खेळ खूप जुना आहे.

मोबाईल आणि टीव्ही च्या नादात मुलांचे बालपण कुठे हरवत आहे हेच कळत नाही.