Saturday, June 5, 2021
मनातला कचरा
Friday, June 4, 2021
जागतिक पर्यावरण दिन
जागतिक पर्यावरण दिन
लेखन : श्री.प्रदीप सुरवसे©
पर्यावरणाची सुरक्षा आणि संरक्षण करण्यासाठी जगभरात जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो.५ जून १९७४ ला पहिला जागतिक पर्यावरण दिन साजरा केला गेला.या दिवसाला Eco Day,World Environment Day,WED असेही म्हणतात.यात दरवर्षी १४३ पेक्षाही जास्त देश सहभागी होतात.हा पर्यावरणीय उत्सव साजरा करण्यासाठी १९८७ पासून यजमान देश दरवर्षी बदलण्याची पद्धत सुरू झाली.दरवर्षी नवीन देश व शहर आणि नवीन थीम यात घेतलेली असते.आजपर्यंत भारत दोन वेळा यजमान देश होता.२०११ ला थीम होती Forests Nature At Your Service आणि २०१८ ला Beat Plastic Pollution.
सध्या कोरोना सारख्या जागतिक महामारी मुळे काही काळ का होईना लोकडाऊन मुळे जगभरात मोठमोठी कारखाने बंद राहिली. जी कधीच बंद राहू शकली नसती.त्यामुळे कारखान्यातून निघणारे सर्व टाकाऊ पदार्थ मग ते पाणी असो वा धूर,यामुळे होणारे प्रचंड प्रमाणावरील प्रदूषणाला खूप मोठा ब्रेक मिळाला.सर्वच मानवजातीला कमी अधिक प्रमाणात घरात राहावे लागले.म्हणजे सर्व प्रकारच्या वाहनांचा वापर अचानकपणे कमालीचा कमी झाला.आणि वाहनातून निघणाऱ्या विषारी वायूमुळे गुदमरणाऱ्या वसुंधरेने थोडासा श्वास घेतला.
पर्यावरण दिनाच्या निमित्ताने एक गोष्ट विचार करायला लावणारी आहे.पूर्वी निसर्गाने याचे संकेत खूपदा दिले.झाडे लावा झाडे जगवा,का ते आता कळतंय.ऑक्सिजन अभावी कितीतरी रुग्णाचे मृत्यू झाल्याचा बातम्या अगदी ताज्या आहेत. एक पूर्ण वाढलेलं झाड दरवर्षी ११८ किग्रॅ एवढे ऑक्सिजन पुरवते.आणि दोन पूर्ण वाढ झालेली झाडं ४ सदस्य असणाऱ्या कुटुंबाला ऑक्सिजन द्यायला पुरेशी आहेत.वेगवेगळ्या कारणांसाठी दरवर्षी लाखो झाडे कापली जातात पण लावली आणि जगवली किती जातात आपल्याला माहीत आहेच. आज माणसं जेव्हा ऑक्सिजन अभावी मरायला लागली तरीही आपल्याला झाडांचं महत्व कळत नाही. दरवर्षी फोटोपुरती लाख-कोटी झाडं लावली जातात. यापेक्षा प्रत्येक व्यक्तीने त्याच्या आयुष्यात फक्त एकच झाड लावलं आणि जोपासलं तरी पुरेसं आहे.कारण भारताची लोकसंख्या १४० कोटी आहे म्हणजे किमान १०० कोटी झाडं सहज लावली जातील.झाडं लावतांना वड,पिंपळ,आंबा,चिंच,जांभूळ,कडुलिंब यासारखी झाडं निवडल्यास आणखी उत्तम होईल.काही गावांच्या बाजूला माळरान,डोंगर भाग,तर प्रत्येक गावाला गायरान आहेच.अशा ठिकाणी त्याच गावातील तरुणांनी झाडं लावायला सुरुवात केली तर परिसर हिरवागार व्हायला काहीच वेळ लागणार नाही.
एकूणच झाडं,जंगल आणि पाण्याची उपलब्धता कमी होत असल्याने वन्य जीव जंगलाबाहेर फिरत आहेत.वस्तीत वन्य प्राणी घुसण्याची कारणे देऊन त्यांची हत्या केली जात आहे.अप्रत्यक्ष होणारी शिकार तर कुणालाच माहीत नाही.यात काही वन्य प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.पर्यावरण दिनाच्या निमित्ताने मानवाने वन्य प्राण्याला वाचविणे किती गरजेचे आहे हे लक्षात घेऊन पाऊले उचलली पाहिजेत.अन्यथा मानव जंगली प्राण्याचं भक्ष्य व्हायला वेळ लागणार नाही.
पूर्वी खूप पाऊस पडायचा असं सांगतात. पण पाऊसमान आता हळू हळू कमी होत आहे.जलचक्र बिघडले आहे.शेतकऱ्यांना दोनदा तीनदा पेरण्या कराव्या लागतात.पावसाळ्याच्या सुरुवातीला पाऊस पडतो आणि मग लगेच महिनाभर गायब होतो.शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसतो.हे सर्व पर्यावरणीय असंतुलनाचे परिणाम आहेत.मागच्या १५ वर्षात आपण बघतो आहे.जगातील तापमानात वर्षानुवर्षे वाढ होत आहे.दरवर्षी उन्हाळ्यात उष्णता कमालीची वाढत आहे.मानवाने त्याच्या गरजा मर्यादित ठेवून साधे जीवन जगल्यास आणि मागणीच न केल्यास बाजारात बऱ्याच वस्तूंचे उत्पादन घटेल.खाजगी वाहनांचा वापर कमी करणे,ग्रीन हाऊस चा वापर कमी करणे,शेतातील पालापाचोळा न जाळणे,जंगलातील वणवे रोखणे,कारखान्यांचा वापर कमी करणे,जास्तीत जास्त वृक्ष लागवड व जतन करण्याने आपण तापमान वाढ रोखू शकतो.चला तर या निमित्ताने एक तरी झाड लावूया.
जागतिक पर्यावरण दिनाच्या आपणा सर्वांना शुभेच्छा….! प्रदीप सुरवसे©५.६.२०२१



