'लॉकडाऊन' सर्वांचा परिचित झालेला शब्द.हेच शीर्षक असणारी एक कादंबरी सप्टेंबर २०२० साहित्य विश्वात आली आहे.लेखक आहेत यसनकार श्री.ज्ञानेश्वर प्रकाश जाधवर.
सन २०२० हे साल सर्व जगासाठी काळे वर्ष ठरावे असेच घडले.कोरोना नावाची महामारी जगात आली आली म्हणता म्हणता आपल्या देशात आली.आणि मग अचानक लॉकडाऊन करावे लागले. अशा वेळी बरीच कुटुंबं गड्या आपला गावच बरा म्हणून गावाकडे निघू लागली.अशाच एका मध्यमवर्ग कुटुंबाच्या कोरोना काळातील प्रवासाची ही कहाणी आहे.
नायक संदेश शिंदे त्याची पत्नी स्वाती मुलगी स्मिता आणि मुलगा सुमितला घेऊन गावाकडे जात असतो.मग गाडी पम्चर होणं,टोल नाक्यावर पकडणे,मग हॉस्पिटल,कोरोना चाचण्या आणि एकानंतर एक येत जाणारी संकटे असा सर्व प्रवास आहे.
नायक आयसोलेशन मध्ये असतांना त्याच वार्डातील इतर पेशन्ट जे की सर्व वर्गातून आलेले आहेत.त्यांच्या तोंडून जे अनुभव आपण वाचतो ते कोरोनाकाळातील सत्य अनुभव आहेत याची प्रचिती येते.कादंबरी लिहितांना कोरोनाबद्दलची आणि उपचार व इतर महत्वाची माहिती विविध रुग्ण आणि डॉक्टरांच्या तोंडून लेखक देतात.त्यांच्या लेखनावरून लेखकाने कोरोना महामारी आणि लॉकडाऊन बद्दल सविस्तर निरीक्षण व केल्याचे लक्षात येते.
कहाणी जसं जशी पुढे सरकते तशी वाचायला उत्सुकता वाढते.लॉकडाऊन काळातही काही लोक माणुसकीला काळिमा फासणारे कृत्य कसे करतात हे रितू चौधरीच्या उदाहरण आणि चोपडे च्या वाहिनीवरील बलात्काराचा प्रसंग यावरून लक्षात येते.
नायकाचा तंद्री लागल्यानंतर प्रकशाबिंदूशी होणारा संवाद आणि पत्नीच्या निधना नंतरही तिच्याशी होणारा संवाद हे लेखकाचं लेखन कौशल्य वाखाणण्याजोगे आहे असे दाखवतो.
संदेश शिंदे आणि त्याची पत्नी यांच्यात होणारी लहानसहान कुरबुर प्रत्येकाला आपली वाटते.शिरा,खीर,गावाकडची टेकडी,कानातले झुमके या गोष्टींवरून किती लहान इच्छा आणि साधारण आयुष्य सामान्य माणसांची असतात हे कळतं.
सन २०२० मधील लॉकडाऊनचे यथार्थ दर्शन घडवणारी ही कादंबरी नक्की वाचा.
लेखक: श्री.ज्ञानेश्वर प्रकाश जाधवर
किंमत : ३००/-
पुष्ठे :२६४
प्रकाशन : न्यू इरा पब्लिशिंग हाऊस, पुणे.
शब्दांकन व मनोगत : श्री.प्रदीप सुरवसे