आयुष्य खुप सुंदर आहे.आणि हे जग दररोज नित्य नव्या गोष्टींनी भरलेले फुललेले आहे.जगात किती वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी,पक्षी,फुलं आणि बऱ्याच प्रजाती आहेत.आपल्या भाषा,बोली,कपडे यात पण किती विविधता आहे.भारतासारख्या देशात तर कमालीची विविधता आपल्याला बघायला मिळते.आपल्या आजूबाजूला बघा ना या निसर्गात एकसारखेपणा कुठेच दिसत नाही.एकसारखेपणा नसावा म्हणूनच हे जग दररोज बदलत असते.आणि बदल हेच एकमेव सत्य आहे.खरं तर आपल्या मनाला पण सतत विविधतेचा ध्यास असतो,नाविन्यपणा हवा असतो.आणि याच गोष्टींमुळे जगण्याला एक नवा उत्साह सतत मिळत राहतो.
रोज तेच तेच काम करून कंटाळा येतो,तेच जेवण रोज खायला नको वाटते.कपडे पण आपण तेच तेच घालत नाहीत.आपल्या आजूबाजूची माणसं पण किती वेगवेगळी असतात बघा ना!किती वेगळेपणा असतो त्या सर्वांमध्ये सर्वांचे दिसणे,कपडे घालणे,आवडी निवडी,प्रकृती,विचार सगळं किती वेगळं असतं. खरंच त्या निर्मात्याची कमाल आहे.एक व्यक्ती तयार केली की पुन्हा नंतर कधीच त्यासारखी व्यक्ती तो बनवत नाही.मग कोणी जुळी भावंडं जरी असली तरी दिसणं सोडलं तर बाकी बऱ्याच गोष्टींमध्ये कमालीचा फरक असतो.म्हणजे आपल्यासारखे या जगात कुणीच नाही.या जगातील प्रत्येक व्यक्ती एकमेवाद्वितीय आहे.विचार करून बघा यावर.तुम्ही देखील या जगात एकमेव आहात. आपल्याला बनवल्यानंतर त्या विधात्याने तो साचा पुन्हा वापरला नाही.पूर्वी ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही होता,आता कलर आहे.विचार करा या पृथ्वीवर रंगच नसते तर किंवा रंगाच्या छटाच नसत्या तर!विचार पण नको वाटतो ना करायला.मग आपल्या आजूबाजूला असणारी चालती बोलती माणसं बघा.प्रत्येकाचे विचार वेगळे,आवडी निवडी वेगळ्या,आचार वेगळे,कुणाला लाल रंग आवडतो तर कुणाला हिरवा कुणाला पोपटी तर एखाद्याला काळाही आवडतो.आपल्या प्रत्येकाला कपडेही एकसारखे आवडत नाहीत,हं आपण अनुकरण करतो थोडंस पण ते ही एका मर्यादेपर्यंत.आपल्या सर्वांना सगळं काही वेगवेगळं पाहिजे म्हणून तर एवढी उत्पादनं येतात बाजारात.माणसातल्या या गुणांमुळेच तर एवढी सुंदरता आहे जगण्यात.तर मग दुसऱ्या व्यक्तीचं मत आपल्याला का पटत नाही?कुणी काही सादर केलं तर आपण लगेच द्वेष करतो? असं बऱ्याचदा होतं की आपल्याला वाटतं मी म्हणतो तेच खरं ? मी वागतो तेच बरोबर ? समोरच्या व्यक्तीने असं असं वागू नये? असं बोलू नये? विचार करा आपल्याला भेटणारी प्रत्येक व्यक्ती एक माणूस आहे.मग माणूस म्हणल्यावर जेवढं आपल्याला लागू होतं तेच सर्व त्या व्यक्तीलाही लागू होतं.
समोरच्या माणसाचं चुकलं या विचारामुळे आपले सामाजिक, कौटुंबिक नातेसंबंध या एकाच गोष्टींमुळे बिघडतात आणि ते तसेच नादुरुस्त राहतात.काहीजण तर खूप जवळचे रक्ताचे नातेवाईक असतात पण बऱ्याच वर्षांपर्यंत बोलत नाहीत.एवढंच काय असेही लोक बघण्यात येतात जे मृत्यूनंतरही एखाद्या माणसाशी वैर ठेवतात. खरं तर दैनंदिन जीवनात आपण पावलोपावली लक्षात ठेवायला पाहिजे की माणसं चुकीची नसतात तर ती आपल्यापेक्षा वेगळी असतात.जी आपलं मान्य करतात आणि थोडीफार आपल्यासारखी असतात आपल्या हो मध्ये हो मिळवतात त्या माणसांशी आपलं चांगलं जमतं. ज्यांना आपल्या गोष्टी पटत नाहीत,आपल्या चूक ज्या व्यक्ती काढतात,आपलं ज्यांना लागतं किंवा ज्यांचं आपल्याला लागतं आपण आशा माणसांपासून दुरावतो.या जगात कोणीही स्वतःची चूक मान्य करत नाही.आणि आपण स्वतःला माणूस म्हणतो.आणि वरून चुकतो तोच माणूस असंही म्हणतो,माणूस हा चुकीचा पुतळा आहे.किती विरोधाभासी वाक्य आहेत ही! तुमचं हे असं चुकलं असं जर कोणी म्हणलं तर आपण लाख कारणं आणि समर्थन देऊ आपलं चुकलं असेल हे माहीत असूनही,पण मान्य करणार नाही.आपल्या प्रत्येकाला वाटतं आपल्याला समजून घ्यावं गैरसमज नको!
आपल्याला जर कोणी म्हणाले की तुमच्या स्वभावात थोडा बदल करा,तुमचा आवाज थोडा व्यवस्थित करा,तुमचे केसांची स्टाईल थोडी बदला,किंवा असे कपडे घालण्याऐवजी दुसरे घाला हे आपल्याला आवडेल, का असं म्हणलेलं आवडेल की तुम्ही जसे आहात तसे चांगले आहेत छान आहात.म्हणजे काय तर आपण जसे आहोत तसे सगळ्यांना आवडावे असा आपला अट्टाहास असतो पण लोक जसे आहेत तसे आपल्याला आवडत नाहीत.आणि खरी गोम इथेच आहे.आपण इतरांना स्वीकारलं पाहिजे ते जसे आहेत तसे.आपण इतरांची मतं स्वीकारली पाहिजेत,हे ही मत असू शकतं असा विचार करून.कधी कधी आपल्याला दुसऱ्याने घातलेले कपडेही आवडत नाही कारण आपली आवड वेगळी असते पण त्याला आवडतात हे तरी स्विकार करा.बरंच हलकं वाटेल.अशा विचार करण्याच्या पद्धती मुळे बरेच प्रश्न सुटतील.बाप लेक किंवा सासू सून दोन पिढ्यांचं अंतर असतं कसं मॅच होईल सगळं,कसं आवडेल दोन्ही पिढीना एकमेकांचं.यासाठी अगोदर जे आहे जसं आहे तसं स्वीकारणं गरजेचं आहे.
तसेच आपण कोणी काय बोललं तर लगेच मनात ठेवतो.दोन्हीही प्रकारे,चांगलं आणि वाईटही.पण जास्त काळ मनात राहतात ते लागलेले शब्द.आपण रिकामं भांडं लगेच उचलू शकतो पण पाण्यानं भरलेलं उचलायला जड जाते.आणि ते दहा मिनिटे डोक्यावर ठेवा असं सांगितलं तर आपल्याला किती त्रास होईल याचा.मग जर पाण्यानं भरलेलं भांडं आपण दहा मिनिटे डोक्यावर ठेवू शकत नाही तर लोकं इतरांचं बोलणं दहा दहा वर्षे डोक्यात ठेवतात,विचार करा किती ताण येत असेल.काही लोक तर आयुष्याच्या शेवटपर्यंत लक्षात ठेवतात लोक काय बोलले ते.आणि पुन्हा पुन्हा मनाला सूचना देतात की मी त्याला कधी विसरणार नाही तो मला खूप बोलला तो असा बोलला तसा बोलला.पण खरंच काही उपयोग.तर काहीच उपयोग नाही याचा.त्यामुळे हे ओझं उतरायला पाहिजे आपल्या मनाच्या कचरपेटीत साठलेला हा कचरा कुठेतरी रिकामा केला पाहिजे.म्हणजे आपल्याला चांगले आयुष्य जगता येईल.आता लोक म्हणतात चांगले आयुष्य म्हणजे काय पैसा, बंगला, गाडी,दागिने,परिवार.फक्त हे म्हणजे आयुष्य नाही यासोबत मनाची शांती आणि आत्म्याचं समाधान ही महत्वाचं आहे.आणि यासाठी एकच गोष्ट करता येते.ज्या व्यक्तीमुळे आपण दुखावले गेलो आहोत त्याला माफ करणं.अगदी मनातून माफ करणं.जे शब्द आपल्याला लागले आहेत ते सोडून देणं.स्वतःसाठी, मन हलकं होण्यासाठी हे सोडून देणं शिकणं खूप महत्वाचं आहे मित्रांनो.
लेखन - श्री.प्रदीप सुरवसे
दिनांक-२५.०७.२०२०
मो.९५४५५५४६३७